Ratnagiri News जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा होतोय -हास ; वन विभागाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून या गंभीर समस्येकडे वन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.

मंडणगड तालुक्यातील शेडवई मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला तोडलेल्या लाकडांचा मोठा ढीग अज्ञाताने रचून ठेवला आहे. मंडणगड तालुका हा डोंगरी आणि दुर्गम तालूका असल्याने फारसे कोणी अधिकारी तसे कारण असल्याशिवाय फिरत नाहीत नेमकि हीच संधी साधून लाकूड माफियांनी राजरोसपणे लाकुडतोड केलेली आहे. ही लाकुडतोड आमचं कोण कोण काही वाकडं करणार नाही या आविर्भावात वन विभाग अधिकारी आपल्या खिशात असल्यागत मोठ्या धाडसाने मंडणगड तालुक्यात अगदी सगळीकडेच मोठ्या प्रमाणात लाकुडतोड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असल्याने झाडे कमी झाली आहेत त्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढून जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि ऋतूचक्रात बदल होत आहेत. जंगलेच्या जंगले नष्ट झाल्यामुळे अनेक दुर्मिळ वन्यजीव, पक्षी आणि वनस्पतींचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असून त्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्या, हत्ती यांसारखे जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत, ज्यामुळे जीवघेणे संघर्ष वाढत आहेत. झाडांची मुळे माती धरून ठेवतात आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करतात. वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होऊन दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.

दुर्गम जंगल भागांमध्ये वन कर्मचाऱ्यांची पुरेशी गस्त नसल्ल्याने लाकूड तस्करांचे धाडस वाढत आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर किंवा तस्करांवर कायद्यानुसार तात्काळ आणि कठोर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवण्यासाठी वन विभागाने आपली यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांनीही वृक्षारोपण व संवर्धनासाठी पुढे येणे अत्यंत गरजेचे झाले आहे.