
केंद्र सरकारने यूपीआयसाठी लागू केलेल्या शुल्काविरोधात काँग्रेसने भाजपविरोधात गिफ्ट अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश कमिटीने या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण राज्यात व्यापाऱ्यांना घेऊन भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे खासदार, मंत्री आणि आमदारांच्या घरी धडक देणार आहेत.
केंद्र सरकारने 2 हजारांपेक्षा जास्त यूपीआय पेमेंटवर शुल्क लादण्याचा निर्णय हा जनताविरोधी आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा निषेध म्हणून काँग्रेस व्यापाऱ्यांना घेऊन भाजपचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरावर धडक देणार आहेत. त्यांना तेथे जाऊन दोन हजारांपेक्षा अधिक किमतीचे सामान गिफ्ट केले जाणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.


























































