
गणपती बाप्पापाठोपाठ माहेरवाशिणीच्या रूपाने गौराईंचे सोनपावलांनी आज घरोघरी आगमन झाले. गौरींच्या आगमनाचा सर्वत्र उत्साह दिसून आला. गौरींचे आगमन झाल्यावर उद्या, शुक्रवारी त्यांचे पूजन होईल. त्यासाठी लागणाऱ्या फळे-फुलांच्या खरेदीसाठी आज बाजारात मोठी गर्दी झाली.
अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते. आज अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने महिलांना आपल्या सोयीनुसार गौरींचे आवाहन आणि सजावट करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. अनेक घरांमध्ये दुपारनंतर तिन्हीसांजेपूर्वी गौरी आवाहन करण्यात आले. महालक्ष्मी असे संबोधिल्या जाणाऱ्या गौरींच्या आगमनाचा महिलांमध्ये उत्साह होता.
गुरुवारी सकाळपासून सायंकाळी 7 वाजून 54 मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्राचा कालावधी असल्याने घरोघरी सर्व तयारी पूर्ण झाल्यावर ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आवाहन करण्यात आले. कुलाचाराप्रमाणे काही ठिकाणी खड्याच्या गौरी तर काही ठिकाणी तेरडा वनस्पती गौरी म्हणून पूजण्यात आल्या. काही ठिकाणी मुखवटे धान्यांच्या राशीवर ठेवून पूजन करण्यात आले. त्याआधी आकर्षक रांगोळ्या काढून आणि हळदी-कुंकवाचे जल शिंपडून गौरी आवाहन करण्यात आले. गौरींना जरीकाठाच्या नव्या साडय़ा, फुलांची आरास, फराळाचे पदार्थ आणि विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती.
आज पूजनाची लगबग
गौरी आगमनानंतर महिलांची शुक्रवारी होणाऱ्या गौरी पूजनाच्या तयारीची लगबग सुरू झाली. हळदी-कुंकू समारंभातील खिरापत तयार करण्यापासून ते गौरी पूजनाच्या नैवेद्याच्या तयारीत महिला व्यग्र झाल्या होत्या. माहेरवाशीण गौराईला पुरणपोळी किंवा 16 प्रकारचे नैवेद्य किंवा 16 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात येईल.
नवसाला पावणारी नाखवा परिवाराची गौराई!
वरळी कोळीवाडा येथील सवाशे वर्षांची परंपरा असलेली आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी गौराई यावर्षीदेखील मोठय़ा थाटात माहेराला आली आहे. चंदू नाखवा परिवाराच्या या गौराईला बोललेला नवस फेडण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. अपत्यप्राप्ती झाल्यानंतर भाविकांकडून गौराईच्या मांडीवर बाळाला ठेवण्याची प्रथा या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे किशोर वरळीकर यांनी सांगितले.



























































