
मुंबईच्या विविध भागांतील गटार, नाले, भुयारी मार्गांची दुरुस्ती आणि स्वच्छतेचे काम पालिकेने हाती घेतले असून यासाठी ६ कोटी १५ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये माहीम-मानखुर्द परिसरातील भुयारी मार्गावरील रॅम्प दुरुस्ती, चेंबूरमधील मोठ्या व्यासाच्या मिडल बेन वाहिनीवर गंजरोधक कोटिंग आणि जाफरबाग उपविभागातील नाल्यांवर संरक्षक भिंतींचे काम करण्यात येणार आहे.
या कामांसाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. यानुसार माहीम आणि मानखुर्द येथील विद्यमान रॅम्पवर काँक्रीटचे बोलार्ड बसविणे, कुंपण उभारणे आणि तुटलेल्या कंपाऊंड वॉलची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी ४७ लाख ४२ हजार ५५३ रुपये इतका अंदाजित खर्च असून निविदेची रक्कम ४७ लाख ५० हजार रुपये आहे.
तसेच चेंबूरमधील जाफरबाग उपविभागात पाईपलाईनपासून विच्चरलीपर्यंतच्या ३००० मिमी व्यासाच्या मिडल बेन वाहिनीला तीन थरांचे इपॉक्सी आधारित गंजरोधक कोटिंग करण्यात येणार आहे. या कामासाठी ५ कोटी २५ लाख ३८ हजार ५०४ रुपये खर्च अपेक्षित असून निविदेची रक्कम ५ कोटी २५ लाख ४० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच जाफरबाग उपविभागातील विद्यमान नाल्यांवर संरक्षणात्मक आरसीसी भिंतींची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजित खर्च ४२ लाख ५५ हजार ३७२ रुपये असून निविदेची रक्कम ४२ लाख ६० हजार रुपये आहे.


























































