
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गुजरातमधील प्रसिद्ध श्री सोमनाथ मंदिराची भव्य आरास साकारली आहे. देशातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख मुंबईकरांना करून देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.
गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतार्ंलगांपैकी पहिले ज्योतार्ंलग म्हणून श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. अनेक ऐतिहासिक आक्रमणांनंतरही या मंदिराचे पुनर्निर्माण होत राहिले. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने मंदिराच्या पुनर्बांधणीला चालना मिळाली आणि 1951 मध्ये मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना झाली.
या ऐतिहासिक मंदिराची रचना, शिखर, सभामंडप, कोरीव काम आणि परिसराचे सौंदर्य यांचा बारकाईने अभ्यास करून भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या आरासीतून सोमनाथ मंदिराचा इतिहास, भगवान शिवाविषयीची श्रद्धा आणि मंदिराचे स्थापत्यवैभव यांची माहितीही देण्यात येत आहे. मंडळाचे संस्थापक व सल्लागार तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ही आरास साकारण्यात आली आहे. यापूर्वी मंडळाने शिर्डीचे साई मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केदारनाथ मंदिर तसेच गोव्यातील श्री शांतादुर्गा मंदिर प्रतिकृती साकारल्या होत्या.


























































