हरमनसेना आज जपानवर तुटून पडणार, आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक राखण्यासाठी हिंदुस्थान सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया चषकातील विक्रमी आठवे विजेतेपद खिशात घालून आत्मविश्वासाने फुललेल्या हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णमोहिमेला आज सुरुवात होत आहे. उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानसमोर हरमनप्रीत कौरची सेना उभी ठाकणार असून सकाळी १०.३० वाजता लढतीला प्रारंभ होईल. थेट बाद फेरी असल्याने आज चूक माफ नाही. पराभवाला पर्याय नाही आणि एक पराभव सुवर्णस्वप्नावर पाणी फेरणार.

या स्पर्धेत साखळी फेरीचा फाफटपसारा नाही. थेट उपांत्यपूर्व फेरीपासून हिंदुस्थानची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूला किंमत आणि प्रत्येक धावेला वजन असणार आहे. आशिया चषकात धावांचा पाऊस पाडणारी शफाली वर्मा पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या आक्रमणाची धुरा सांभाळेल. मात्र स्मृती मानधनाला आशिया चषकात अपेक्षित
सूर गवसला नव्हता. त्यामुळे जपानविरुद्ध तिच्या बॅटमधून आतषबाजीचा नजराणा अपेक्षित आहे. शेफाली-मानधना जोडीने सुरुवातीलाच जपानच्या गोलंदाजीची हवा काढली, तर ऋचा घोषसह मधली फळी धावांचा स्फोट घडवू शकते.

गोलंदाजीत दीप्ती शर्मा आणि श्री चरणी हे हिंदुस्थानचे सर्वात मोठे हुकमी अस्त्र चरणीने अवघ्या ३०व्या टी-२० सामन्यात ५० बळींचा टप्पा गाठला आहे. मधल्या षटकांत तिची फिरकी जपानच्या फलंदाजांना नाचवू शकते. रेणुका ठाकूर, क्रांती गौड आणि नंदिनी शर्मा यांच्या वेगवान माऱ्याला राधा यादव आणि दुखापतीतून परतलेली श्रेयंका पाटील यांच्या फिरकीची जोड मिळणार आहे. कर्णधार हरमनप्रीतलाही आशिया चषकातील संथ फलंदाजी मागे टाकून आज मोठ्या मंचावर धडाका दाखवावा लागेल. घरच्या मैदानाचा फायदा जपानला असला तरी हिंदुस्थानसमोर त्यांची खरी परीक्षा असणार आहे.