अखेर युथ एशियन गेम्सच्या विजेत्यांना न्याय, शासन निर्णयात स्वतंत्र पुरस्कार श्रेणीत स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैदानावर आशियातील देशांशी दोन हात करणाऱ्या युवा खेळाडूंच्या पदकाला कागदावरही योग्य सन्मान मिळावा, या मागणीला अखेर यश आले आहे. ११ सप्टेंबरला एशियन युथ गेम्सच्या विजेत्यांवर अन्याय’ या शीर्षकाखाली दै. सामनांने दिलेल्या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा पुरस्कार धोरणात ‘युथ एशियन गेम्स’ चा स्वतंत्रपणे समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपला पुरस्काराची तरतूद असताना युथ एशियन गेम्सच्या पदक विजेत्यांकडे झालेले दुर्लक्ष आता दूर झाले आहे. नव्या शासन निर्णयात कनिष्ठ अर्थात ‘युथ व ज्युनियर’ गटासाठी स्वतंत्र तक्ताही करण्यात आला असून त्यात युथ कॉमनवेल्थ गेम्ससोबत युथ एशियन गेम्सलाही अधिकृत स्थान देण्यात आले आहे.
या बदलामुळे युथ एशियन गेम्सला आता केवळ उल्लेखापुरते स्थान नाही, तर थेट रोख पारितोषिकाची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

दर चार वर्षांनी होणाऱ्या अधिकृत युथ कॉमनवेल्थ गेम्स आणि युथ एशियन गेम्समधील सुवर्णपदकासाठी २० लाख, रौप्यपदकासाठी १५ लाख आणि कांस्यपदकासाठी १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याच तक्त्यात ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपच्या सुवर्णासाठी ५ लाख, रौप्यासाठी ३ लाख आणि कांस्यासाठी २ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजेच नव्या निर्णयाने युथ एशियन गेम्सचा स्वतंत्र उल्लेख करताना त्यासाठी ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपपेक्षा वेगळी आणि अधिक रोख ७ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयात ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपचा समावेश होता.

मात्र युथ एशियन गेम्सचा स्वतंत्र उल्लेख नव्हता. जुन्या निर्णयाच्या तक्त्यात ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपसह ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, ज्युनियर वर्ल्ड कप आणि ज्युनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप यांना स्थान होते. नव्या निर्णयाने ही चौकट बदलून युथ एशियन गेम्सचे नाव थेट पुरस्काराच्या तक्त्यात आणले आहे. या निर्णयाचा थेट फायदा सेरेना म्हसकर आणि प्रसाद दिघोळे या कबड्डीतील पदक विजेत्यांना होणार आहे. तसेच या खेळातील प्रशिक्षकांनाही रोख पुरस्काराचा मान दिला जाणार आहे.

नव्या निर्णयामुळे युथ ऑलिम्पिकसाठी सुवर्ण ५० लाख रौप्य ३० लाख आणि कांस्य २० लाख रुपयेः युथ एशियन गेम्स आणि युथ कॉमनवेल्थ गेम्ससाठी २०. १५ आणि १० लाख रुपये, तर ज्युनियर वर्ल्ड आणि ज्युनियर एशियन स्पर्धांसाठी स्वतंत्र पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत.