
केरळमच्या उडुक्की येथील संथानपारा भागात रानहत्तीच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिवकुमार असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील रहिवासी आहे. तो सध्या एका वेलचीच्या मळ्यात काम करत होता.
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवकुमार आणि त्याचा मित्र संथानपारा येथील नजंगलार-कंपनी इस्टेट रोडवरून चालले होते. त्यावेळी त्या भागात भरकटलेल्या एका रानहत्तीने त्यांच्यावर हल्ला केला.
शिवकुमारचा मित्र तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र हत्तीने शिवकुमारवर हल्ला केला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. हत्ती निघून गेल्यावर काही लोक घटनास्थळी जमा झाले. तोपर्यंत शिवकुमारचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी शुक्रवारी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.



























































