
गिरगाव म्हणजे संस्कृती, उत्सवाचा जल्लोष. गिरगावात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. इथल्या उत्सवाशी अनेकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. आठवणीतल्या गणपतींची भेट गिरगाव चौपाटीवर झाली तर… याच संकल्पनेवर आधारित देखावा गिरगाव येथील संकेत बाचल आणि कुटुंबाने साकारला आहे. ‘फुटाणेबाईंचा राजा’ असे नाव असलेल्या गणरायाचा देखावा भक्तांचे आकर्षण ठरला आहे.
संकेत बाचल याने गिरगाव चौपाटीवर विसर्जन सोहळ्याचा देखावा घरगुती गणपतीसमोर उभा केला आहे. त्यामध्ये गणेश गल्ली, गिरगावचा महाराजा, गिरगावचा राजा, लालबागचा राजा, जीएसबी सेवा मंडळ, चंदनवाडी गोड गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, जितेकर वाडी, केशवजी नाईक चाळ, मुंबईचा महाराजा असे 10 गणपतींच्या लहान मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती शाडू मातीच्या आहेत. प्रत्येक गणेशमूर्तीची परंपरा, वैशिष्टय़, मिरवणूक, विसर्जन सोहळा आदीची माहिती देण्यात आली आहे. गणेशभक्तांची गर्दी, वाद्य, नामफलक, निर्माल्य कलश, वाळू… अगदी हुबेहूब चौपाटी साकारण्यात आली आहे. आठवणीतल्या गणरायांची गिरगाव चौपाटीवरील भेट सुखावणारी आहे.
गेली पाच-सहा महिने नोकरी सांभाळून संकेत बाचल याने अत्यंत मेहनत घेऊन हा कलात्मक देखावा साकारला आहे.



























































