
मलबार हिल येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या जलाशयाच्या कामाच्या सुधारित आराखडय़ाच्या तांत्रिक पुनर्विलोकनाचे काम आयआयटी रुरकी करणार आहे. यासाठी मुंबई महापालिका आयआयटी-रुरकीला 22 लाख रुपये सेवाशुल्क देणार आहे. यासाठी निविदा न मागता आयआयटी – रुरकी या संस्थेची थेट नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या जलविभागामार्फत फिरोजशाह मेहता गार्डन परिसरातील मलबार टेकडी जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे काही झाडे बाधित होण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर बाधित झाडांची संख्या कमीत कमी ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाअंती मलबार हिल जलाशयाच्या पश्चिम बाजूस असलेल्या कर्मचारी निवासस्थान आणि पंपिंग स्टेशनच्या जागेवर 52 दशलक्ष लिटर (एमएल) क्षमतेचा तीन-स्तरीय पर्यायी साठवण जलाशय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय नवीन व्हॉल्व्ह गॅलरीचे बांधकाम करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेसाठी प्रकल्प सल्लागार मे. पेंडणकर असोसिएट्स यांनी संरचनात्मक आराखडे, डिझाइन व कार्यपद्धती तयार केली आहे.


























































