
बळीराजाचा महत्त्वाचा सण पोळा कोरडा गेला, विघ्नहर्त्याच्या स्वागतालाही पावसाने हजेरी लावली नाही, सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले असतानाच, गौरीचे आगमन पाऊस घेऊन झाले आहे. हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, गुरुवारी मराठवाडा विभागातील 5 जिल्हय़ांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, 31 महसुली मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मराठवाडा विभागातील परभणी जिल्हय़ात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून या जिल्हय़ातील 13 महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीड, लातूर आणि हिंगोली या तीन जिल्हय़ांतील प्रत्येकी 5 महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. याशिवाय नांदेड जिल्हय़ातही मुसळधार पाऊस झाला आहे.
लातूर जिल्हय़ालाही दिलासा
गौरी आगमनाला पाऊस आल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. लातूर जिल्हय़ातील लातूर आणि रेणापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या जिल्हय़ातील तीन महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये लातूर मंडलांत 85.50, रेणापूर-67 आणि पळशी मंडळात 65.50 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागातील अन्य जिल्हय़ांतही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.


























































