निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान, ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेस हे नाव आणि गवत-फुल हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर आयोगाने ममता बॅनर्जी यांना पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. ममतांनी या निर्णयाला तीव्र आक्षेप घेतला आहे. पक्षाची ओळख पुसून टाकणे म्हणजे मुलाला आईपासून दूर करण्यासारखे आहे. हा हिंदुस्थानी लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया ममतांनी दिली होती. त्यानंतर आज त्यांनी कायदेशीर लढाईचे पाऊल उचलले आहे.

ममतांच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार

पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही नव्या जोमाने मैदानात उतरलेल्या ममतांना आज धक्का बसला. त्यांच्या पक्षाच्या उमेदवार संचिता प्रधान (डे) यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली. त्या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना भेटल्या होत्या.

काँग्रेस उमेदवाराला अटक

संचिता डे यांनी माघार घेताच ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर झाल्यानंतर काही तासांतच मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली. 2007 च्या एका हत्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

भाजपचा हा नेहमीचा फॉर्म्युला – ममता बॅनर्जी

मिलन प्रधान यांना आताच अटक कशी झाली? इतके जुने प्रकरण नेमके याच वेळी कसे उकरून काढण्यात आले. ही कारवाई संशय निर्माण करणारी आहे. भाजपचे सुडाचे राजकारण व अत्याचाराचा हा नेहमीचा पॅटर्न आहे. निवडणूक आयोग आणि भाजप पार्टनरशीप करून रोजच्या रोज लोकशाहीची हत्या करत आहेत, असा हल्ला ममता बॅनर्जी यांनी चढवला.

आम्ही लढणारही आणि जिंकणारही – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर तोफ डागली. ‘निष्पक्ष निवडणुकांवर भाजपचा विश्वासच नाही. चोरी करूनच त्यांना सत्ता मिळवायची आणि राखायची आहे. त्यांना निवडणुका लढायच्याच नाहीत. पण काँग्रेस घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. आम्ही लढणारही आणि जिंकणारही’, असे राहुल गांधी यांनी ठणकावले.