
60 वर्षांपूर्वी प्रीमियर ऑटोमोबाईल्स पंपनीला कल्याणमध्ये देण्यात आलेल्या 170 एकर जमीन वाटप प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ही जमीन वाटप करताना नियमांचे उल्लंघन झाले होते, अशी तक्रार कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. त्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे. मात्र सहा दशकांनंतर सरकार हे प्रकरण उकरून काढत असल्याबद्दल संशय निर्माण झाला आहे.
कल्याण येथे प्रीमियर ऑटोमोबाईल्स पंपनीला ‘पद्मिनी’ कारचे उत्पादन करण्यासाठी ही जमीन देण्यात आली होती. औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने तत्कालीन सरकारने ही जमीन दिली होती. परंतु प्रीमियर पंपनी डबघाईला आल्यानंतर कार उत्पादन ठप्प झाले. सध्या या 170 एकर जमिनीपैकी 57 एकर रुणवाल समूहाकडे, 55 एकर लोढा डेव्हलपर्सकडे, 41 एकर सुंदर निवास प्रॉपर्टीजकडे आहे तर सुमारे 13 एकर जागा विविध सरकारी विभागांकडे आहे.
पटोले यांनी 11 ऑगस्ट रोजी यासंदर्भात तक्रार करून या जमिनीचे हस्तांतरण कोणत्या आधारे झाले याची चौकशी करावी, अशी मागणी केली. महसूल मंत्र्यांच्या निर्देशावरून 4 सप्टेंबरला एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यात 1962 ते 1965 या काळातील प्रशासकीय आदेशांची पडताळणी होणार आहे. 60 वर्षांपूर्वीच्या जमीन वाटपाची एसआयटी चौकशी होत असल्याने त्याचा उद्योग जगताच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे. खासगी विकासकांनी या जमिनीवर मोठे गृह प्रकल्प उभारले आहेत. त्यात हजारो लोकांनी घरांसाठी गुंतवणूक केली आहे. त्यावर या चौकशीचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.



























































