अहंकारी व्यक्तीचा उदय आणि अस्त निश्चित! सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान, रोख कुणाकडे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेव्हा एखादी व्यक्ती अहंकारात येऊन काम करते आणि सर्व काही आपल्याच नियंत्रणात आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसारच घडली पाहिजे असे मानू लागते, तेव्हा तो तिचा भ्रम असतो. अशा अहंकारी वृत्तीचा उदय आणि अस्त हा निश्चितच असतो, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. उज्जैन येथे आयोजित ‘युवा धर्म संसद’ कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. त्यांचा रोख नक्की कुणाकडे यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माणूस अहंकारात येऊन विचार करतो की सर्वत्र माझीच सत्ता चालते, पण वास्तव तसे नसते. आज उद्घाटनाचे भाषण करताना माझ्या मनात अनेक विचारांची उलथापालथ सुरू आहे, असेही मोहन भागवत म्हणाले. याचा व्हिडीओ शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात त्यांनी आरएसएस, भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.

काँग्रेसचा भाजपवर निशाणा

भागवत यांच्या विधानावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अविनीश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीवर संघही नाराज आहे. काँग्रेसने नेहमीच या हुकुमशाहीविरोधात आवाज उठवला आहे. संघाचे सरकारमधील स्थान आणि ऐकणे कमी झाले आहे, हेच या विधानातून स्पष्ट होते, असा टोला अविनीश यादव यांनी लगावला.