
गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुंबईत विजेचा धक्का लागून घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये एका लहान मुलीसह तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमींपैकी एका 12 वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काळाचौकी येथे पाण्याच्या स्टॉलमध्ये वीजप्रवाह उतरल्याने आणि जोगेश्वरी येथे कृत्रिम विसर्जन तलावात विजेचा धक्का लागल्याने या दुर्घटना घडल्या.
काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळील दिग्विजय मिल चाळीजवळ पिण्याच्या पाण्याचा स्टॉल उभारण्यात आला होता. रविवारी पहाटे 2ः42 च्या सुमारास या स्टॉलमध्ये अचानक वीजप्रवाह उतरल्याने तेथे उपस्थित भाविकांना विजेचा तीव्र धक्का बसला.
या दुर्घटनेत मसिना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रागिणी घनश्याम यादव (8) या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर ग्लोबल रुग्णालयात सुजाता (33) यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेत रुही सिंग (12) हिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर किरण नाईक (19), तन्वी हांडे (19) आणि साहिल तरे (19) यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व ’बेस्ट’चे अधिकारी दाखल झाले आणि सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. रोषणाई व स्टॉलसाठीच्या तात्पुरत्या मीटरची वायरिंग स्थानिक इलेक्ट्रिशियनने आधीच तोडल्याचे ’बेस्ट’च्या पाहणीत आढळले असून, काळाचौकी पोलीस व मीटर इन्स्पेक्टर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दुसरी दुर्घटना जोगेश्वरी पूर्व येथील श्यामनगर तलाव परिसरात (लिली व्हाईट इमारतीजवळ) घडली. पालिकेच्या ’के/उत्तर’ विभागातर्फे येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी पाच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर यातील चार तलाव बंद करण्यात आले होते.
रविवारी दुपारी 12ः20 च्या सुमारास ठेकेदाराने नियुक्त केलेला कामगार रोहित भीमू राठोड (19) हा आधीच बंद करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात उतरला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बंद तलावात वीजप्रवाह कसा उतरला आणि सुरक्षेचे उल्लंघन झाले का, या दृष्टीने मेघवाडी पोलीस व पालिका प्रशासन तपास करत आहे.
नातेवाईकांचा आरोप
घटनेनंतर नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. विसर्जन बंद होते किंवा तिथे धोका होता तर आतमध्ये जाण्याची परवानगी कशी दिली, तिथे ना पालिकेचे अधिकारी होते ना सुरक्षेचे नियम पाळले गेले, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.






























































