
राज्यातील बहुतांश जिह्यांत पुढील पाच दिवसांत वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवत हवामान खात्याने काही जिह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिह्यांत दुष्काळाचे संकट तीव्र बनले आहे. याचदरम्यान पावसाच्या समाधानकारक हजेरीची शक्यता असल्याने दुष्काळी भागातील बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने 21 ते 25 सप्टेंबरदरम्यान काही जिह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही जिह्यांत ताशी 30 ते 40 किमी वेगाचे वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे. ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाचे संकट तीव्र बनत चालले आहे. शेतकरी, ग्रामीण जनता आभाळाकडे डोळे लावून बसली आहे. त्यामुळे पावसाचे पुनरागमन ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मुंबईत पावसाची रिपरिप सुरू राहणार मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे. पुढील आठवडाभर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. पावसाच्या हजेरीनंतरही शहराचे तापमान कमाल ३२ आणि किमान २६ अंशांच्या आसपास राहणार आहे.































































