
अॅपलने आयफोन 18 प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स हे दोन फोन लाँच केले आहेत. या फोनच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. परंतु, हिंदुस्थानात या फोनच्या किमती जास्त असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्रीला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आयफोनच्या किमती या प्रत्येक देशात वेगळ्या असून हिंदुस्थानच्या तुलनेत दुबईत आयफोन 18 प्रो तब्बल 33 हजार रुपयांनी स्वस्त किमतीत मिळत आहे.
आयफोन 18 प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स हे फोन दुबईत स्वस्त मिळत असल्याने अनेक आयफोन चाहते फोन खरेदी करण्यासाठी दुबईला जात आहेत. विमानाच्या तिकिटाचा आणि व्हिसाचा खर्च धरूनही हा फोन हिंदुस्थानच्या तुलनेत दुबईत स्वस्त किमतीत मिळत आहे. एकापेक्षा जास्त फोन खरेदी केल्यास 50 हजार ते 60 हजारांपर्यंत फरक पडतो, असे मुंबईतील एका ग्राहकाने सांगितले. केरळममधील एका तरुणाने दुबईला जाऊन आयफोन 18 प्रो मॅक्स फोन खरेदी केला. त्यामुळे माझी 20 हजार ते 30 हजार रुपये बचत झाल्याचे या तरुणाने सांगितले. यूएईमध्ये फोनवर केवळ 5 टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे दुबईत फोन स्वस्त किमतीत मिळतात. उलट हिंदुस्थानात भरमसाठ जीएसटी, व्हॅट आणि वेगवेगळे टॅक्स लावल्याने किमती महाग होतात.


























































