
देशभरात राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी दुरुस्ती अर्थात ‘एसआयआर’ मोहिमेमध्ये हजारो लोकांची नावे वगळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक दिग्गजांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर चौफेर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. अखेर निवडणूक आयोगाने या नोटिसीवर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने मतदाराला नोटीस पाठवली म्हणजे त्या मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असे होत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंबंधी तत्काळ खुलासा केला आहे. दिल्लीतील ज्या व्यक्तींना नोटीस पाठवण्यात आली आहे ती सिस्टम जनरेटेड आहे. ज्या मतदारांनी कागदपत्रे जमा करताना किंवा मतदार नोंदणीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरली आहे, अशा मतदारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सध्या जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. कोणत्याही मतदारांची नावे त्यांना माहिती दिल्याशिवाय वगळण्यात येणार नाहीत, असेही या निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले आहे.
निवडणूक आयोगाकडून ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत त्या मतदारांनी आपले म्हणणे दाखल करावे. तसेच आवश्यक कागदपत्रे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा बूथ लेवल अधिकाऱ्याकडे जमा करावीत. मतदारांचे काही दावे आणि हरकती असल्यास एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत दाखल करावीत. मतदार निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे आपल्या मतदारसंघातील संबंधित आवश्यक कागदपत्रे 29 ऑक्टोबरपर्यंत पडताळणी करू शकतील. 4 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल.



























































