
मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील 14 फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला काँग्रेस, समाजवादी पक्षासह सत्ताधारी भाजपनेही विरोध केला आहे. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी भाजपने आज केली.
झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत 14 फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीचे बांधकाम तोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्षाकडून आमदार रईस शेख यांनी महापालिकेच्या झोपडय़ांवरील कारवाईला विरोध दर्शवला होता, तर कॉंग्रेस पक्षाकडून गटनेते अशरफ आझमी यांनीदेखील पालिकेच्या झोपडय़ांवरील कारवाईला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने उंच झोपडय़ांवरील कारवाईला आज विरोध केला. भाजपचे सभागृह नेता गणेश खणकर यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना या अनुषंगाने पत्र लिहिले आहे.
धोकादायक असलेल्या झोपडपट्टी क्षेत्रातील धोकादायक बांधकामे, ज्याच्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असेल अशा बांधकामावरती आपण योग्य ती पावले उचलावी व आपण अशा प्रकारच्या नोटिसा सरसकट देऊ नये, असे झाल्यास मुंबई शहरामध्ये मोठय़ा प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो व गरीब मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू शकतो, असेही खणकर यांनी म्हटले.

























































