
मॅटवर जोरदार झुंज, अतिरिक्त फेरीतही थरार आणि अखेर निकालासाठी पुन्हा एकदा वजनकाटा. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या पारंपरिक 60 किलो एमएमए प्रकारात सुचिका तारियाल आणि सिंगापूरची हुई हून तेओ यांच्यातील उपांत्य लढतीचा शेवट अक्षरशः धक्कादायक पद्धतीने झाला. लढतीत निर्णायक फरक करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर लागू झालेल्या टायब्रेकर नियमानुसार ज्याचे वजन कमी, ती खेळाडू विजेती ठरली. अवघ्या 700 ग्रॅमच्या फरकाने तेओ अंतिम फेरीत पोहोचली आणि सुचिकाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. तरीही सुचिका एमएमए प्रकारात पदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली.
लढतीनंतरचा घटनाक्रमही तितकाच नाटय़मय होता. सुरुवातीला सामन्याचा निर्णय तेओच्या बाजूने देण्यात आला. मात्र हिंदुस्थानी संघाने या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर अधिपृत पुनरावलोकन करण्यात आले आणि लढत बरोबरीची असल्याचे निश्चित झाले; पण एवढय़ावर नाटय़ संपले नाही. बरोबरीच्या लढतीचा निकाल लावण्यासाठी नियमपुस्तिका पुढे आली आणि त्यात वजनाचा निकष निर्णायक ठरला.



























































