
गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईला निघालेले गणेशभक्त आज सलग दुसऱ्या दिवशी कोंडीच्या चक्रव्यूहात अडकले. माणगाव ते इंदापूरदरम्यान पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रचंड उकाड्यामुळे प्रवाशांचा चांगलाच घामटा निघाला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांचे अतोनात हाल झाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील रखडल्याने यावर्षीही गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा फटका बसला. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर आता हेच कोकणवासीय आपल्या घरी परतू लागले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात काढली आहे. रविवारी निर्माण झालेली वाहतूक कोंडी आज कायम राहिल्याने सलग दुसऱ्या दिवशी माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतूक अक्षरश: ठप्प झाली.
कचेरी रोड, बामणोली रोड आणि निजामपूर-पुणे मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे माणगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतुकीचा ताण वाढला. माणगावसोबतच इंदापूर परिसरातही परतीच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात काढली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या काढल्याने महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदाकला.
वाहतूक पोलिसांची दमछाक
सलग दुसऱ्या दिवशी माणगाव, इंदापूर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कोकणातून मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची आजदेखील चांगलीच रखडपट्टी झाली. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांचे अतोनात हाल झाले. प्रचंड उकाड्यामुळे प्रवाशांचा चांगलाच घामटा निघाला. वाहतूककोंडी फोडताना पोलिसांचीदेखील दमछाक झाली.



























































