
५०० ची नोट केमिकलमध्ये धुतली की ‘डबल’ होते, असे आमिष दाखवून हातचलाखीने फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा काशिगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५०० रुपयांच्या १५१ नोटा केमिकलच्या सहाय्याने धुऊन त्या खऱ्या नोटा असल्याचा बनाव आरोपींनी केला. या बदल्यात अधिक रकमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने आर्थिक फसवणूक करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस शिपाई अर्जुन बोरसे यांच्या फिर्यादीवरून अमोल वसंत बंडगर, शंकर चक्रवर्ती आणि निशा मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांच्या १५१ नोटा असा ७५ हजार ५०० रुपये तसेच इतर मुद्देमाल असा एकूण १ लाख ३८ हजार ८७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्वर शेख करीत आहेत.






























































