सूर्या नदीत चौघे बुडाले; एका तरुणाचा मृत्यू, गणेश विसर्जनात दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान कासा येथील सूर्या नदीच्या विसर्जन घाटावर चौघेजण बुडाले असल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या दुर्घटनेत तिघांना वाचविण्यात यश आले असून शिवराज गवळी (१७) या तरुणाचा नदीच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेश मंडळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चारोटी नाका येथील लोहार मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोहार मित्र मंडळाची सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती सूर्या नदीत विसर्जित करण्यात येत असताना चारजण पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती समजताच सुरक्षा कर्मचारी, नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. त्यातील तीनजणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र शिवराज गवळी याचा शोध लागला नाही.

मृतदेह सापडला
रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. सुमारे चार तास शोधमोहीम राबवूनही शिवराजचा ठावठिकाणा लागला नाही. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आल्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवराजचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान उत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःहून नदीच्या खोल पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जित करण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.