अरेच्चा… कडकी लागली म्हणून स्वतःच्या घरातच घातला दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडकी लागली म्हणून एका व्यक्तीने घरातच दरोडा घातल्याचा अजबगजब प्रकार पेण तालुक्यातील आंबेराई-बेणसे गावात घडला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने सहा लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्यानंतर या चोरीची नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःच तक्रार केली. चोरी मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तापास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास केल्यानंतर चोरीचा हा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

आंबेराई-बेणसे येथील रहिवासी दीपक भुरे याने पत्नी आणि आई कृष्ण जन्माष्टमीसाठी बाहेर गेलेल्या असताना घरातच दरोडा टाकला. त्याने आई आणि पत्नीचे सुमारे सहा लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरून घरातच दडवून ठेवले. घरात चोर घुसले हे दाखवण्यासाठी त्याने सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले. बेडरूममधील कपडेही विस्कटून टाकले. पत्नी आणि आई घरी आल्यानंतर त्याने चोरी झाल्याचा कांगावा करून थेट नागोठणे पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत जास्त असल्यामुळे या प्रकरणी गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. या प्रकरणी संशय आल्यामुळे पोलिसांनी दीपक याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली.