
डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी)- मतदार याद्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एसआयआर मोहिमेत मृत दाखवलेल्या मतदाराचा अर्ज शिवसैनिकांनी आज पुन्हा भरला. निवडणूक आयोगाकडून डोंबिवलीत झालेल्या या झोलविरोधात दैनिक सामनाने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाची एकच पळापळ उडाली होती. या प्रकरणी शिवसैनिकांनी प्रशासनाला जोरदार धारवेर धरले होते.
डोंबिवलीमध्ये मतदार याद्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या एसआयआर सामना प्रभाव मोहिमेदरम्यान दीप्ती अंधारी यांना मृत दाखवून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले होते. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा हा झोल उघडकीस आला. यानंतर दीप्ती यांनी थेट मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. मात्र त्यांना कोणीच दाद दिली नाही. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली.
दीप्ती अंधारी यांची मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी उपशहर प्रमुख प्रमोद कांबळे, शाखाप्रमुख हेमंत गिमावकर आणि शाखा युवाधिकारी अनुज मोरे यांनी विधानसभा मतदार अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि दीप्ती यांच्या नावाची मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.



























































