दिवसा भीक, रात्री घरफोड्या; सहाजणांच्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातात भिक्षेची वाटी घेऊन ते परिसरात फिरायचे… घरांची पाहणी करायचे आणि बंद घर हेरून रात्री हात साफ करायचे, अशा पद्धतीने घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून १५२ ग्रॅम सोने, ४ किलो १५ ग्रॅम चांदी, २ लाख ५५ हजारांची रोकड आणि चार मोबाईल, असा तब्बल १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरती लालन यांच्या घरातून १५ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याचा पोलिसांच्या वागळे युनिटने समांतर तपास सुरू केला. ८० ते ८५ सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची ओळख पटवण्यात आली. तसेच प्रदीप गौतम, राजकुमार राजनाथ आणि दक्ष मारवाडी यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने ठाणे शहर परिसरात घरफोडीचे सहा गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी भिक्षा मागण्यासाठी घरांच्या परिसरात फिरत आणि बंद घरांवर पाळत ठेवून संधी साधत घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रबाळे, नारपोली, वागळे इस्टेट आणि राबोडी पोलीस ठाण्यांतील गुन्हे या तपासातून उघडकीस आले आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.