एसआयआरमध्ये सवातीन कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप, संशयास्पद मतदारांची नावे जाहीर करा; काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेत (एसआयआर) 2 कोटी नव्हे तर 3 कोटी 28 लाख मतदारांची नावे वगळली गेल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसने आज निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. 75 हजार बोगस मतदारांचा ठावठिकाणाचा लागत नसल्याचे सांगत या संशयास्पद मतदारांची बुथनिहाय यादी जाहीर करा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. दावे व हरकतींसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या कामात पारदर्शकता नाही, सर्व कारभारच गौडबंगाल व संशयास्पद आहे. हे एक मोठे षड्यंत्र असून मतदानाचा हक्क हिरावून घेत लोकशाहीचा गळा घोटण्याचा मोठा डाव आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

राज्यात मतदारांची संख्या 9 कोटी 78 लाख होती. यातून 3 कोटी 28 लाख मतदारांना वगळले तर 6 कोटी 5 लाख मतदार शिल्लक राहतात. राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे आणि त्यात प्रौढ लोकसंख्या 10 कोटींच्या वर आहे. 10 कोटी मतदार असायला हवेत, पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ते 6 कोटी 5 लाख इतकेच आहेत.

हरकती नोंदविण्यासाठी आणखी तीन महिने द्या

राज्यात गणेशोत्सवासह इतर सण व उत्सव असताना दावे व हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरची वेळ निवडणूक आयोगाने दिली आहे, ही वेळ तीन महिने वाढवून दिली पाहिजे. मात्र निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

त्या मतदारांची आकडेवारी वेबसाईटवर का नाही?

1 कोटी 22 लाख मतदारांच्या माहितीमध्ये विसंगती आहे त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावलेल्या नाहीत. संशयास्पद मतदारांची आकडेवारीही आयोगाने वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली नाही, असे सपकाळ म्हणाले.