
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाही आणि घोटाळेबाज कारभाराविरोधात निवडणूक आयोगात बंड झाले आहे. हे बंड चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली आहे. ‘इलेक्शन कमिशन चोर आहे,’ अशा घोषणा देत ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. एसआयआर हा सर्वात मोठा घोटाळा असून ज्ञानेश कुमार हे त्याचे सूत्रधार आहेत. या देशद्रोही माणसाला तत्काळ पदावरून हाकला, अशी मागणी विरोधी पक्षांसह सामान्य जनता करत आहे.
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या मतदार फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेमध्ये आतापर्यंत देशभरातील 13 कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याविरोधात मतदारांनी प्रचंड आक्रोश केला. विरोधी पक्षांनीही अनेक आक्षेप घेतले, मात्र निवडणूक आयोगाने सर्व आक्षेप धुडकावून लावत एसआयआर सुरूच ठेवला. ही सगळी प्रक्रिया ज्ञानेश कुमार यांनी हुकूमशाही पद्धतीने राबवल्याचे आता उघड झाले आहे. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेला आणि त्यातील अनेक गोष्टींना विरोध दर्शवला होता. दहा महिन्यांत तब्बल 14 वेळा लेखी हरकती नोंदवल्या. त्यापैकी चार हरकती एकाच दिवसात नोंदवण्यात नोंदवल्या. ज्ञानेश कुमार हे अनधिकृत व बेकायदा कृती करत आहेत, असेही एका हरकतीत नमूद करण्यात आले होते. कॅबिनेट सचिवांकडेही तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर प्रक्रिया रेटली. अनेक आदेश संधू आणि जोशी यांना अंधारात ठेवून काढले असे समोर आले आहे. त्यामुळे देशातील वातावरण प्रचंड तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, अरविंद केजरीवालांसह सर्वच नेत्यांनी ज्ञानेश कुमार, भाजप आणि मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.
बंगालच्या निवडणुका पुन्हा घ्या! – ममता
‘ज्ञानेश कुमार आयुक्त असताना झालेल्या निवडणुका आणि एसआयआरमध्ये घोटाळा झाला आहे. हे सगळे ठरवून केले आहे. भाजप आणि निवडणूक आयोग यांची जॉइंट व्हेंचर कंपनी आहे. त्यांनी बंगालची निवडणूकही अशीच चोरली. ही निवडणूक पुन्हा घ्या, अशी मागणी त्यांनी केली.
ज्ञानेश कुमार नकोच – अखिलेश
‘आम्ही याआधीही एसआयआरच्या तक्रारी केल्या होत्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. उत्तर प्रदेशातील निवडणूक मॉडेल बंगाल आणि बिहारमध्ये राबवले गेल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला. पुढील निवडणुका ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्वाखाली नको,’ अशी मागणी त्यांनी केली.
ज्ञानेश कुमार मास्टरमाइंड – केजरीवाल
‘ज्ञानेश कुमार हे निवडणूक घोटाळ्याचे मास्टरमाइंड आहेत. त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला गेला पाहिजे आणि दिल्ली, बिहार, बंगाल, महाराष्ट्राच्या निवडणुका पुन्हा घेतल्या पाहिजेत, अशी मागणी केजरीवाल यांनी केली.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
अंतर्गत मतभेदाची चर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. एसआयआर प्रक्रियेसह सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीने व एकमताने घेण्यात आले आहेत. दोन्ही आयुक्तांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर चर्चा करून तोडगा काढण्यात आला होता. त्यावर कोणत्याही निवडणूक आयुक्तांनी औपचारिक असहमती नोंदवलेली नाही, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.
तुम्ही वाचू शकणार नाही
‘मतचोरी हा जनतेविरुद्धचा गुन्हा असून संविधानावरचा थेट हल्ला आहे. भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोग मिळून हा देशद्रोह करत आहेत. त्याचा हिशेब होणारच. आयोग आणि तेथील अधिकाऱयांना माझे सांगणे आहे की, तुम्ही जे काही करत आहात तो देशद्रोह आहे, पण वेळ बदलेल. आम्ही तुम्हाला पकडणार, तुम्ही वाचू शकणार नाही,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.




























































