एसआयआरच्या नावाखाली शिक्षकांवर कामाचा डोंगर, मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेने उठवला आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकांनी शिकवायचे की सतत शासकीय कामांच्या ओझ्याखाली दबून जायचे? विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी असताना शिक्षकांच्या खांद्यावर जनगणना, बीएलओ, एसआयआर  आणि अन्य प्रशासकीय कामांचे ओझे टाकले जात आहे. यामुळे शिक्षकांना मानसिक रुग्ण करायचे आहे का, असा संतप्त सवाल मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेने केला आहे.

एसआयआरच्या कामाला मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचा विरोध नाही. मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला शिक्षकांनी यापूर्वीही सहकार्य केले आहे आणि आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका कायम आहे. मात्र शिक्षकांच्या अध्यापनाच्या वेळेवर आणि त्यांच्या सुट्टीवर सातत्याने अतिक्रमण करून हे काम करून घेण्यास शिक्षक सेनेचा ठाम विरोध असल्याचे मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचे अध्यक्ष के. पी. नाईक यांनी सांगितले.

हा प्रश्न आता केवळ शिक्षकांचा राहिलेला नाही. तो शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे नाईक म्हणाले.

सकाळी शाळा, दिवसभर विद्यार्थ्यांचे अध्यापन, त्यानंतर एसआयआरचे काम आणि गरज पडली तर रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त जबाबदारी, शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे आधी शिक्षकांना विश्वासात घेऊन कामाचे नियोजन करा. अध्यापनाचा वेळ वाचवा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करा आणि शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करा, अशी मागणी मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेने केली आहे.