15 ऑक्टोबरपर्यंत गोरेगाव-फिल्मसिटीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज, 1.26 किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे  काम अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जेएमएलआर) प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या गोरेगाव -दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान 1.26 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक काsंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा प्रवास जलद होईल. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येईल. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजित बांगर यांनी शुक्रवारी या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच विविध निर्देश दिले.

जेएमएलआर प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान 3 x 3 मार्गिकेच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

या पुलाचे मुख्य बांधकाम 100 टक्के पूर्ण झाले आहे. त्यात एपूण 31 खांबांची उभारणी, एपूण 30 स्पॅन आदींचा समावेश आहे. खांबांवर तुळई बसविणे, डेक स्लॅबचे ओतकाम तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या अॅप्रोच रोडचे कामही पूर्ण झाले आहे.

पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतुकीसाठीची क्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात लोड टेस्ट घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सज्ज होईल.