मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबाला केले बहिष्कृत, नंदीवाले तिरमली जातपंचायतीने फतवा काढल्याची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव  तालुक्यातील धामोरी येथील नंदीवाले तिरमली समाजातील एका कुटुंबाला मुलीने समाजातीलच तरुणाशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून जातपंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात जातपंचायतीने कुटुंबाला दंड ठोठावला तसेच समाजातील इतरांनी या कुटुंबाशी संबंध ठेवू नयेत, असा निर्णय घेतल्याची तक्रार पीडित कुटुंबाने केली आहे.

भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या मुलीने सज्ञान झाल्यानंतर त्याच समाजातील तरुणाशी विवाह केला. मात्र, हा विवाह समाजाच्या नियमांविरुद्ध नसल्याचे सांगत जातपंचायतीने तो अमान्य केल्याचा आरोप आहे. यानंतर धामोरी येथे जातपंचायत भरवून अहिरे कुटुंबावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाने कर्ज काढून त्यापैकी 50 हजार रुपये भरले. उर्वरित रक्कम भरता न आल्याने कुटुंबावर सामाजिक निर्बंध लादण्यात आल्याचा आरोप आहे.

सुख-दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाला बोलावू नये, त्यांच्याशी कोणीही संवाद साधू नये, तसे केल्यास संबंधितांनाही दंड करून समाजातून बहिष्कृत केले जाईल, असा निर्णय घेतल्याचे पीडितांनी म्हटले आहे. मुलीलाही कुटुंबीयांना भेटण्यास प्रतिबंध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जातपंचायतीच्या निर्णयामुळे स्वतःच्या भावाच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आले नाही, असा दावा आनंदा अहिरे यांनी केला आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही कुटुंबावर निर्बंध घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अहिरे कुटुंबाने या प्रकाराची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर ‘जातपंचायत मूठमाती अभियाना’चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि ‘कोपरगाव अंनिस’चे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडित कुटुंबीयांना सोबत घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. सामाजिक बहिष्कारास प्रतिबंध करण्यासंदर्भातील कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना देण्यात आले. या निवेदनाच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.