
मुंबईहून गुजरातला जाताना भरधाव कारची डंपरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात मुंबईतल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे.
गुजरातमधील सुरत जिह्यातील भारतमाला एक्सप्रेस वेवर ही घटना घडली आहे. मुंबईहून शंखेश्वर रायजी मंदिर येथे जाणाऱ्या एका कारने डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात राजीव जितेंद्र जैन, जयंतिलाल चुनीलाल दोषी, प्रवीण जैन अशी तीन मृतांची नावे समजली असून अन्य एका मृताचे नाव समजले नाही. या धडकेत कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सुरत जिल्हा वाहतूक पोलीस, कामरेज पोलीस आणि द्रुतगती मार्ग गस्त पथकाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने कार हटवण्यात आली. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
























































