
मराठवाड्यासह महाराष्ट्रात पडलेल्या भयाण दुष्काळाची दहशत फक्त थोरा-मोठ्यांच्याच नाही, तर अजाण लेकरांच्या मनावरही बसली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या धाराशीव दौऱ्यात शनिवारी याचा अनुभव आला. दुष्काळ पडल्यापासून धाराशीव येथील एक चिमुकला वडिलांची पाठ सोडेनासा झाला आहे. सावलीसारखा त्यांच्यामागे फिरतो आहे. पप्पा काही बरं-वाईट तर करून घेणार नाहीत ना अशी भीती त्याच्या मनात आहे. एका शेतकऱ्याने मांडलेली ही व्यथा ऐकून आदित्य ठाकरे अक्षरशः हेलावून गेले. त्यांनी या कुटुंबाला तत्काळ मदत देत धीर दिला. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा शब्दही दिला.
धाराशीव जिह्यातील खानापूर येथे आदित्य ठाकरे यांनी दुष्काळाने करपलेल्या पिकांची पाहणी केली. आदित्य ठाकरे बांधावर आलेले पाहून शेतकऱयांनी त्यांना गराडा घातला. वाया गेलेली पिके दाखवून व्यथा मांडल्या. नूर बेग हेदेखील तिथे होते. मुलासोबत ते शेतावर आले होते. आदित्य ठाकरे यांना पाहून तेही त्यांच्या जवळ आले. त्यांनी स्वतःच्या पिकांची परिस्थिती आणि कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची माहिती आदित्य ठाकरे यांना दिली. मुलाच्या मानसिक अवस्थेबद्दलही सांगितले. ‘आईजवळ झोपणारं माझं लेकरू आता रोज माझ्याजवळ येऊन झोपतं. एका उशीवर आम्ही असतो. लघवीला गेलो तरी मागून येतं, शेताकडं गेलं तरी तो तिथं येतो. शेतात तुझं काम नाही. तू शाळेत जा असं त्याला सांगितलं तर तो म्हणतो मग तुम्ही कशाला जाता? मला सोडायलाच मागत नाही, असं नूर बेग यांनी सांगितले. त्यावेळी सगळेच स्तब्ध झाले.
आमच्या शेतात पीकच फुटलं नाय!
नूर बेग यांची व्यथा ऐकून आदित्य ठाकरे यांनी मुलगा अल्ताफ याला जवळ घेतले. खांद्यावर हात ठेवून त्याची विचारपूस केली. अल्ताफने जमेल त्या शब्दांत वडिलांची वेदना बोलून दाखवली. ‘आमच्या शेतात पीकच फुटलं नाही. सोयाबीन काही आलंच नाही. शाळेची फी द्यायला पैसे नाहीत. पप्पा म्हणले, पीक खराब झालं. मी म्हणलं, शाळेचं पैसे कसे द्यायचे? तर ते म्हणले, कायतर करू. नाहीतर कर्ज उचलू,’ असे मोहम्मद म्हणाला. वडिलांना आजार आहे. औषधाचेही पैसे नाहीत, असेही त्याने सांगितले. हे वास्तव समजून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्याच्या फीसाठी व वडिलांच्या औषधांसाठी आर्थिक मदत दिली.
72 पेक्षा भयाण अवस्था
‘मराठवाडय़ात यंदा 72 पेक्षा भयाण परिस्थिती आहे. माणसांचे तर आहेच, पण जनावरांचेही हाल होतायत. माझ्याकडच्या म्हशी विकून टाकल्या. त्या घेणाऱ्यानंही अजून पैसे दिले नाहीत. तो म्हणतो, विक्री झाल्यावर देतो. चहूबाजूने अडचण झालीय. शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आल्याशिवाय काही होणार नाही, असे एका शेतकऱयाने सांगितले. सगळय़ा गोष्टीसाठी सरकार कर्ज घेते, मग शेतकऱयांसाठी कर्ज घ्यायला काय हरकत आहे, असा सवालही शेतकऱयांनी केला.
























































