
प्रभादेवी येथील मिरवणुकीवेळी अनुचित घटना घडली. के.जी. मार्गचा राजा बाप्पाच्या मिरवणुकीत होंडा सिटी कार घुसली. कारने चौघांना धडक दिली. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी दादर पोलिसांनी 21 वर्षीय कारचालक प्रणव अग्रवाल याच्याविरोधात गुन्हा नोंद केला.
प्रभादेवी येथे संध्याकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास के.जी. मार्गचा राजाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. कार्यकर्ते व भाविक मिरवणुकीत मोठय़ा उत्साहात सहभागी झाले होते. दरम्यान, त्याचवेळी मंडळाच्या समोरच्या सोसायटीत राहणारा प्रणव अग्रवाल हा त्याची होंडा सिटी कार वळवून सोसायटीत जात असताना कारची चौघांना धडक लागली. जखमींपैकी दोघांना तत्काळ केईएम तर अन्य दोघांना खासगी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. दादर पोलिसांनी प्रणवला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


























































