
निवडणूक आयोगाचे कामकाज आणि मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवरून देशात सध्या मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रतिकूल परिस्थितीही कशी शांतता शिकवते, यावर भाष्य केले आहे.
राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “समुद्र खवळलेला असताना मला त्यात पोहायला आवडते. कारण हा खवळलेला समुद्र तुम्हाला शिकवतो की हे रौद्र रूप म्हणजे शांततेचाच दुसरा प्रकार आहे.”
दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानंतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत एसआयआर प्रक्रियेसंदर्भातील निर्णय आणि आदेशांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले होते. हे निर्णय त्यांच्या माहितीविना घेण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता.

























































