
पुण्याच्या जुन्या पेठांमध्ये सण-उत्सवांच्या काळात निर्माण होणारा ध्वनीप्रदूषणाचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, ‘सध्याच्या काळात पेठांमध्ये राहणे ही एक प्रकारची शिक्षा झाली आहे,’ अशी परखड टीका डीजेच्या विरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांनी केली.
‘मधुरजग प्रतिष्ठान’, ‘ब्राईट्स सोसायटी’ आणि ‘विचारवेध’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते बापट यांचा गौरव करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना सुरुवातीलाच बापट यांनी ‘पेठांमधून कोण कोण आलेले आहेत? शनिवार, नारायण, सदाशिव…’ असा प्रश्न उपस्थितांना केला.
बापट म्हणाले, ‘पेठांची वस्ती ही दीडशे वर्षांपूर्वीच्या दैनंदिन जीवनमानाला अनुसरून उभी राहिलेली आहे. अरुंद रस्ते, दाट वस्ती आणि त्यात उत्सवाच्या काळात होणारी गर्दी यामुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरश: असह्य होते. गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक पेठा सोडून जात असल्याच्या बातम्या आल्या. स्वतŠची राहती घरे सोडून नागरिकांना पलायन करावे लागते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शेण खाऊन आणि गोमूत्र पिऊन माजलेले देवभोळे, धर्मभोळे, उत्सवखोर हे सोल्यूशन म्हणून सांगतायेत. उत्सवांमुळे त्रास होत असेल तर नागरिकांनी पेठा सोडून जावे, असा सल्ला देत आहेत,असा संताप बापट यांनी व्यक्त केला.
बापट यांच्या भूमिकेचे अमोल पालेकर यांनी कौतुक केले. यावेळी अभिनेते सुमित राघवन, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे उपस्थित होते.
शांतता ही सुविधा नाही, जगण्याचा भाग
पेठांमध्ये एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका मोठय़ा प्रमाणावर आहेत. अभ्यासिकेची जाहिरात करताना ‘शांततेचे वातावरण’ हा घटक आवर्जून नमूद केला जातो. ‘शांतता ही केवळ सुविधा किंवा विशेषाधिकार नसून नागरिकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. शांततेत व निर्भयपणे जगण्यासाठी शांत वातावरण आवश्यक आहे,’ असे बापट यांनी सांगितले.




























































