
अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न पार पडल्यानंतर रायगड जिल्ह्यातील भक्तांना आता साखरचौथीच्या गणपतीचे वेध लागले आहेत. मंगळवार २९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीचे आगमन होत असून पितृ पंधरवड्यात आणखी एक बाप्पा येणार आहे. दीड दिवसापासून २१ दिवसांपर्यंत घरोघरी विघ्नहर्ता विराजमान होणार आहे. उरण, पनवेल, पेण, रोहे, अलिबाग व अन्य ठिकाणी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अलिबाग, रोहा, सुधागड, पेण आदी तालुक्यांत ९२८ गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर उरण, उलवे, मोरा सागरी, न्हावाशेवा या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसापासून २१ दिवसांपर्यंत सार्वजनिक ४५ तर घरगुती ५७५ बाप्पा विराजमान होणार आहेत. अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपतीचे आगमन होणार असून पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाचा गजर गावागावात घुमणार आहे.
नैवेद्यासाठी सर्व पदार्थ साखरेचे
साखरचौथीच्या गणपतीला खोबरे आणि साखरेचे सारण असणाऱ्या मोदकाचा नैवेद्य दाखवतात म्हणून या गणेशोत्सवाला साखरचौथीचा गणपती उत्सव असे म्हणतात. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे नैवेद्याकरिता सर्व पदार्थ हे साखरेचेच बनवले जातात. साखरेचे २१ मोदक, साखरेच्या पोळ्या घरोघरी तयार करतात. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते























































