
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ‘त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. मेंदू कोणाचा चोरीला गेला आहे? या लोकांनी थेट लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी चोरला, कुठली विचारसरणी. मुद्द्याचं बोला ना? मुद्द्यावर बोला की तुमचा मुख्य निवडणूक आयुक्त हा अमित शहा यांचा एजंट आहे. भ्रष्ट आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या केली. तुम्ही त्यांची बाजू का घेत आहात. तुम्ही कोण? तुम्ही त्यांचे वकील आहात का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले.
संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने तुम्हाला वकील म्हणून नेमले आहे का? निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि घटनात्मक संस्था असताना मुख्यमंत्री तिची वकिली करत आहेत, याचा अर्थ ते काहीतरी लपवत आहेत. सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीनेच विविध घोटाळे केले आहेत, म्हणूनच ते आयोगाच्या बचावासाठी पुढे येत असल्याचा आरोप त्यांनी केला. फक्त राहुल गांधीच हा विषय मांडत आहेत का? असे विचारत संजय राऊत यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राचा दाखला दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसचे वृत्त कपोकल्पित असल्याचे म्हटले होते, त्यावर संजय राऊत यांनी कॅबिनेट सचिवांच्या पत्राबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी फडणवीसांच्या दाव्यावर सवाल केला. तीन आयुक्त एकत्र येतात, पण ते कोण सांगणार? हे आम्हालाही कळते. तसेच, राजकारण देवेंद्रजींनी किमान आम्हाला तरी शिकवू नये. त्यांच्या आधीपासून आम्ही इथे काम करतोय. पत्रकारितेमध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आम्हाला जास्त माहिती आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसले आहेत म्हणून लोक मान डोलावतात, परंतु ज्या दिवशी ते त्या खूर्चीवर नसतील, त्या दिवशी त्यांच्या बाजूला मच्छरही फिरकणार नाहीत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.























































