
भूकंपाच्या धक्क्याने शनिवारी रात्री उशिरा डहाणू व तलासरी तालुके हादरून गेले. हा भूकंप 3.6 रिश्टर स्केलचा होता. त्याची तीव्रता फार नसली तरी मोठ्या आवाजाने घरातील भांडी कोसळली, झोपेत असलेले गावकरी खडबडून जागे झाले आणि सैरावैरा पळत सुटले. जमीनही थरथरली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण रात्र डहाणू व तलासरीवासीयांनी जागून काढली. लहान मुले आणि महिलाही प्रचंड घाबरल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी हा पट्टा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजला जातो. विशेषतः धुंदलवाडी व परिसरात आतापर्यंत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात काही वर्षांपूर्वी एका मुलीचाही मृत्यू झाला होता. शनिवारी रात्रीच्या 10 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आणि डहाणू व तलासरीमध्ये एकच पळापळ सुरू झाली. जमीन हादरल्याने घरातील भांडीही कोसळली. काहीजण झोपेच्या तयारीत होते. भूकंपामुळे पलंगही हालला आणि झोपेतील ग्रामस्थ जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. आहे.
मोडगाव परिसरात केंद्रबिंदू
रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा डहाणू तालुक्यातील मोडगाव परिसरात असल्याचे आढळून आले आहे. जमिनीच्या आत तब्बल 5 किलोमीटर खोलवर हालचाली झाल्याने भूकंपाचा धक्का बसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या भूकंपाचा तज्ज्ञांनी आढावा घेतला असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन
डहाणू व तलासरी भागात भूकंपाचा सौम्य झटका बसल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागदेखील सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

























































