
कोंबड्यांच्या भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी मुरबाडच्या करचोंडे फाट्यावर घडली. ही धडक इतकी भयंकर होती की यात बाप लेकासह तिघांचा मृत्यू झाला. राम सपाट, अजित खापरे, मारुती खापरे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर जुन्नर येथून कोंबड्यांनी भरलेला पिकअप कल्याणकडे जात होता. तर खेडले तळवली येथील मारुती खापरे, त्यांचा मुलगा अजित खापरे व राम सपाट हे त्यांची पिकअप घेऊन आळेफाटा येथे जात होते. टोकावडे गावाजवळ करचोंडे फाटा येथे पोहचले असता समोरून येणाऱ्या भरधाव कोंबड्यांच्या पिकअपने त्यांना धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला. चालक राम सपाट व अजित खापरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मारुती खापरे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यात त्यांनी प्राण सोडला. पिकअप चालक हफिज शेख आणि क्लिनर खोकम दास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पाच महिन्यांपूर्वी रायते येथे काळी पिवळी गाडीचा असाच अपघात झाला होता. यात अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर थोडे दिवस सात प्रवासी भरण्यात येत होते. त्यातच एका प्रवाशामागे 10 रुपयांची वाढ करण्यात आली. भाडेवाढ करूनदेखील पुन्हा 11 प्रवाशांची वाहतूक सुरू झाली आहे. मुरबाड-कल्याणपाठोपाठ टोकावडे ते वेळुक, तळेगाव, टोकावडे-मुरबाड-धसई मुरबाड, कल्याण मुरबाड या मार्गावर पुन्हा जैसे थे वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

























































