स्मार्ट मीटर बसवताच भरमसाट रकमांची बिले, कारभार न सुधारल्यास शिवसेना आंदोलन छेडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे डहाणूकर अक्षरशः त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटर बसवताच भरमसाट रकमांची बिले नागरिकांना आली आहेत. त्यामुळे वीज बिलांची तपासणी करून ग्राहकांना योग्य आकारणीची बिले मिळावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. महावितरणने कारभार न सुधारल्यास शिवसेना आंदोलन छेडणार, असा इशारा दिला आहे.

डहाणू परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह शेतातील कामे, दुकाने, लघुउद्योग आणि इतर व्यावसायिक कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत संबंधित लाइनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान परिसरात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे वीजबिलांची तपासणी करून ग्राहकांना योग्य आकारणीची बिले द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महावितरणने वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे बिघाड दूर करून तातडीने सुधारणा करावी, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख गिरीश राऊत यांनी केली आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.