
मुसळधार हिमवृष्टीमुळे उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील कालिंदी ट्रेकवर ट्रेकर्सच्या सुटकेसाठी 8 हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. ट्रेकर्सच्या सुटकेसाठी सकाळपासून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ‘ओडन कॉल’द्वारे 29 ट्रेकर्सची सुटका करण्यात आली आहे.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामान आणि मुसळधार हिमवृष्टीत ट्रेकर्स अडकल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले, असे आपत्ती सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले. हेलिकॉप्टर्सद्वारे अडकलेल्यांची सुटका करून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकांकडून संयुक्त बचावकार्य सुरू आहे. आवश्यकता भासल्यास हवाई दलालाही यात सामील करून घेतले जाईल. सध्या, संपूर्ण बचावकार्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे, असे विनोद कुमार यांनी नमूद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात 26 सप्टेंबर रोजी हवामानाचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र सतर्कतेचा इशारा मिळण्याच्या तीन दिवस आधीच 23 सप्टेंबर रोजी ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी निघाले होते. यानंतर, शनिवारी दुपारी जोरदार हिमवृष्टी सुरू झाली, ज्यामुळे रस्ते बंद झाले. यापूर्वी, वन विभागाच्या पथकाने गोमुख-तपोवन ट्रेकवर अडकलेल्या 121 ट्रेकर्सना सुरक्षितपणे गंगोत्री धाम येथे आणले.






















































