
दापोलीमध्ये पर्यटनाला प्रचंड वाव असुनही पायाभूत सोयी-सुविधांचा मोठा अभाव आहे, ही वस्तूस्थिती स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून सातत्याने मांडली जात आहे. ‘कोकणचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीला निसर्गाचे वरदान लाभले आहे, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे येथील पर्यटन विकासाला खीळ बसत आहे.
कोळथरे,लाडघर, कर्दे , मुरुड, पाळंदे , आंजर्ले ,पाडले आणि केळशी यांसारखे विस्तीर्ण व सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. निसर्गरम्य परिसरातील हर्णे येथील समुद्राच्या पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला गोवा किल्ला, फत्तेगड , कनकदुर्ग आणि पन्हाळेकाझी लेणी , नवसे येथील उंच उंच टेकडीवर वसलेले बालापीर , तेलेश्वर येथील पांडवलेणी यांमुळे ऐतिहासिक पर्यटनाला मोठा वाव आहे.
दापोलीत केळशी येथील महालक्ष्मी मंदीर , उटंबर डायरा येथील याकुब बाबा दर्गा , आंबवली बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर मंदीर,आडे येथील परशुराम मंदीर , आंजर्ले येथील श्री कडयावरील गणपती देवस्थान , श्री दुर्गा देवी मंदिर मुरुड येथील दुर्गा देवी, तांबडया रंगाचे पाणी असलेले तामसतीर्थ , बुरोंडी येथील दुर्गा देवी मंदिर , दाभोळ येथील भुयारातील श्री चंडिका देवी मंदिर, कोळथरे येथील कोळेश्वर मंदिर आदी अनेक देवस्थाने पाहण्याजोगी आहेत कि ज्यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता लाभते.
दापोलीचे थंड हवामान, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, आंब्याची व काजूची दाट झाडी आणि समृद्ध जैवविविधता यांमुळे ‘इको-टुरिझम’साठी हे उत्तम ठिकाण आहे. दापोलीत पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी किनारपट्टीवर आणि पर्यटन स्थळांवर प्राथमिक सुविधांची वानवा आहे यामध्ये प्रामुख्याने खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी , समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था तसेच सुट्ट्यांच्या काळात पार्किंगच्या योग्य नियोजनाअभावी तीव्र वाहतूक कोंडी होते. येथील समुद्र किनारे स्वच्छ सुंदर फेसाळणा-या निळ्याशार लाटांच्या पाण्याचे असल्याने येथे आलेल्या अगदी बहुतेकजनांना पाण्यात उतरण्याचा मोह होतोच होतो. पण पाण्यात उतरल्यावर भिजून ओलेचिंब झाल्यावर कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहांची कमतरता भासते समुद्रात स्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी, विशेषतः महिलांसाठी, किनाऱ्यावर पुरेशा चेंजिंग रूम आणि स्वच्छ प्रसाधनांची सोय नाही.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर वॉच टॉवर, जीवरक्षक (लाइफगार्ड्स) आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था (स्ट्रीट लाईट्स) उपलब्ध नाहीत. नवीन पर्यटकांसाठी गावांचे अंतर, दिशा दर्शवणारे किंवा पर्यटन स्थळांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावलेले नाहीत.
पर्यटन हंगामात काही भागात वीज खंडित होणे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणे अशा समस्यांना स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांना तोंड द्यावे लागते. अशा या असुविधांमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. ज्यामुळे अनेक पर्यटक दुसऱ्यांदा येणे टाळतात. याचा थेट फटका स्थानिक होमस्टे , रिसॉर्ट्स, हॉटेल व्यावसायिक आणि छोटे दुकानदार यांच्या रोजगारावर व आर्थिक विकासावर होत आहे. जर शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पर्यटन निधीचा योग्य वापर केला तर दापोली हे महाराष्ट्रातील एक जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनू शकते. मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या हाताला काम आणि स्वयंरोजगार उपलब्ध होणाऱ्या पर्यटन व्यवसायामुळे येथील लोकांना काम धंदा व्यवसायाच्या शोधात कुठेही दुर जायला नको मात्र पर्यटन व्यवसायाला बळकटी देणा-या या व्यवसायाच्या वृद्धीसाठी शासनाने उचित पावले उचलून त्या दृष्टीने येथे आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे.
























































