
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांच्या कानशिलात प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप जनतेच्या प्रश्नांना घाबरली असून, आता त्यांनी हुकूमशाही पद्धतीने थेट नागरिकांविरुद्ध उघड हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असल्याचा घणाघात खरगे यांनी केला.
X वर पोस्ट करत खरगे यांनी आपला संताप व्यक्त केला. “विरोधकांसाठी ईडी-सीबीआय, आणि जनतेसाठी लाठ्या, गोळ्या व कानशिलात! मोदीजींचा भाजप जनतेच्या प्रश्नांनी इतकी बिथरली आहे की, आता त्यांच्यासाठी अँग्री अंकल, ब्रेनवॉश्ड नक्षल आणि आंदोलनजीवी यांसारखे अपशब्दही जुने वाटू लागले आहेत,” असे ते म्हणाले. सत्तेचा अहंकार शिखरावर पोहोचल्यावर जनतेवर दडपशाही करणे आणि त्यांचा अपमान करणे ही सरकारची सवय बनली आहे, अशी टीका त्यांनी केली.
खरगे यांनी मागील काही घटनांचा संदर्भ देत सरकारला लक्ष्य केले. अमित शहांच्या देखरेखीखाली जंतरमंतरवर तरुणांवर झालेला लाठीमार, एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याची घटना आणि एका केंद्रीय मंत्र्याने वापरलेली ‘गोली मारो’ ही प्रक्षोभक भाषा याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजप आणि आरएसएसचे नेते आता केवळ धोरणांद्वारे लोकशाही चिरडत नसून, थेट जनतेवर हात उगारत असल्याचे ते म्हणाले.



























































