
दबाव वाढत गेला. प्रत्येक निशाण्यावर पदकाचे भवितव्य ठरत गेले, पण हिंदुस्थानची युवा नेमबाज ईशा सिंग ही डगमगली नाही. तब्बल पाच शूट–ऑफच्या थरारक झुंजीत शेवटपर्यंत कडवी लढत देत ईशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकावर निशाणा साधला. चीनच्या शिआओ जियारुईशुआनविरुद्ध सुवर्णासाठी झालेल्या निर्णायक शूट ऑफमध्ये ईशाला 2-3 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
अंतिम फेरीत ईशा आणि चीनची शिआओ दोघींनीही 38 हिट्स नोंदवत बरोबरी साधली. दोघींनी हांगझोऊ 2023 मध्ये लिऊ रुईने नोंदवलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या विक्रमाची बरोबरी केली. सुवर्णासाठी झालेल्या पहिल्या शूट ऑफमध्येही सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या शूट ऑफमध्ये शिआओने 3-2 अशी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले आणि ईशाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र ईशाचा पदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. जागतिक क्रमवारीत अव्वल आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेल्या ईशाने पात्रता फेरीत 580 गुण आणि 22 एक्स नोंदवत आठवे स्थान मिळवले. अंतिम फेरीत एका टप्प्यावर ती चौथ्या स्थानावर होती आणि पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी ईशाने पाचपैकी पाच अचूक निशाणे साधत जोरदार पुनरागमन केले.
रौप्यपदकासाठी उत्तर कोरियाच्या किम ह्योन सुकविरुद्धही ईशाला कडवी झुंज द्यावी लागली. दोघींची 34 हिट्सवर बरोबरी झाली. पहिले दोन शूट ऑफ 3-3 असे बरोबरीत सुटले. अखेर तिसऱया शूट ऑफमध्ये ईशाने 3-2 अशी बाजी मारत सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला. अंतिम फेरीतील विविध टप्प्यांवर झालेल्या शूटऑफमधून मार्ग काढत तिने रौप्यपदक निश्चित केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील 25 मीटर पिस्तूल प्रकारातील ईशाचे हे दुसरे वैयक्तिक रौप्यपदक ठरले. हांगझोऊ 2023 मध्येही तिने याच प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. दरम्यान, महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात हिंदुस्थानच्या मनू भाकर, ईशा सिंग आणि राही सरनोबत यांच्या संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
























































