गिलच्या द्विशतकी वादळात वेस्ट इंडीजचा पाचोळा; हिंदुस्थानने प्रथमच पार केले 400पारचे लक्ष्य, रोहितचे दमदार शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वन-डे क्रिकेटच्या इतिहासात आज विक्रमांच्या पानावर आणखी एक सोनेरी अध्याय लिहिला गेला.  कर्णधार शुभमन गिलच्या वादळी द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने अवघ्या 43.3 षटकांत दोन विकेट्स गमावून वेस्ट इंडीजचे 406 धावांचे मोठे लक्ष्य पार केले. 400 हून अधिक धावांचे लक्ष्य वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच यशस्वीपणे पार करत टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेवरही 2-0 अशी विजयी मोहोर उमटवली.

गिलने अवघ्या 117 चेंडूंमध्ये द्विशतकाचा टप्पा ओलांडत वन-डे क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने 133 चेंडूंत तब्बल 223 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत 26 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.

गिलला सलामीला रोहित शर्माची जबरदस्त साथ मिळाली. दोघांनी 26.2 षटकांत 255 धावांची खणखणीत सलामी देत विजयाची भक्कम पायाभरणी केली. रोहितनेही शतकी तडाखा देताना 101 धावांची खेळी केली. त्याने 75 चेंडूंत 10 चौकार व 6 षटकार ठोकले. विराट कोहली 29 धावांवर बाद झाला, तर गिलसोबत ऋतुराज गायकवाड 31 धावांवर नाबाद राहिला.