रिक्षाचालकांची जुन्या भाडे मीटरमुळे कोंडी, नवीन इलेक्ट्रॉनिक मीटरसाठी परिवहन प्राधिकरणाला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक रिक्षाचालक सध्या जुन्या इलेक्ट्रॉनिक भाडे मीटरमुळे चिंतेत सापडले आहेत. अनेक कंपन्यांचे व्यवसाय बंद झाल्याने या जुन्या मीटरचे सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध नाहीत. तसेच दीर्घ वापरामुळे जुन्या मीटरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी विनंती मुंबई रिक्षामेन्स युनियनने मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाला केली आहे.

जुन्या मीटरमुळे यामुळे रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, याकडे लक्ष वेधत मुंबई रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी यांना पत्र लिहिले आहे. जुन्या मीटरऐवजी परिवहन विभागाने मान्यता दिलेल्या इतर कंपन्यांचे नवीन इलेक्ट्रॉनिक भाडे मीटर बसवण्यास रिकॅलिब्रेशनच्या अनुषंगाने परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सॉफ्टवेअरच बाजारात मिळेना

मुंबईतील अनेक ऑटो रिक्षांमध्ये 9 ते 10 वर्षांपासून जुने इलेक्ट्रॉनिक भाडे मीटर वापरले जात आहेत. दीर्घ काळ वापर केल्यामुळे संबंधित जुन्या मीटरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. सद्यस्थितीत काही मीटर उत्पादक कंपन्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे जुन्या मीटरचे सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. जुन्या मीटरच्या प्रोग्रामसाठी आधी 700 रुपये खर्च येत होता. आता तांत्रिक बिघाड झाल्यास प्रोग्रामच्या मूळ किमतीपेक्षा अधिक खर्च करावा लागत आहे.