
रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्जत तालुक्यातील वरची भागूची वाडी येथील अंगणवाडी केंद्रात बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी पुरवण्यात आलेल्या पोषण आहारात कीड लागलेल्या डाळी, उंदरांची विष्ठा आढळली आहे. या भयंकर प्रकरणाची दखल घेत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गोरगरीबांचा जीवाशी खेळ करणाऱ्या या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. तक्रारीनुसार वरची भागूची वाडी येथील अंगणवाडीमध्ये वितरित होणाऱ्या धान्यात डाळींना अळ्या व कीड लागलेली असल्याचे तर साखरेमध्ये उंदरांच्या विष्ठेचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुलांना देण्यात येणारी फळेही कुजलेली व सडलेली असल्याचा आरोप आहे. याशिवाय ओळखपत्र नसल्याचे कारण देत काही गरजू गर्भवती महिलांना पोषण आहारापासून वंचित ठेवण्यात आले, मात्र कागदोपत्री त्यांच्या नावावर नियमित आहार वितरित केल्याचे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
दूषित अन्नाचे पुरावे सादर
या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी मदतनीस उर्मिला पारधी यांनी दूषित अन्नाचे फोटो आणि पुरावे संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सावंत यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या अवर सचिव नूतन कुमारी यांनी २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.




























































