किरीट सोमय्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले; रबाळे पोलीस ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लव्ह जिहादप्रकरणी श्रेय घेण्यासाठी आलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतून पिटाळून लावले. श्रेयवादावरून हा हायहोल्टेज ड्रामा रबाळे पोलीस ठाण्याच्या बाहेर रंगला. सोमय्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमधून बाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर सोमय्यांनी अक्षरशः पोलीस ठाण्याच्या आवारातून पळ काढला.

घणसोली परिसरात एका ३५ वर्षीय मुस्लिम व्यक्तीने १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले आहे. किरीट सोमय्या हे रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमधून बजरंग दलाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांना घेराव घातला.