
कॉफी पिण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी दूध किंवा गरम पाण्यात कॉफी मिसळून पिणे हे सर्वाधिक सामान्य आहे. यांना साधारणपणे ब्लॅक कॉफी आणि मिल्क कॉफी असे म्हटले जाते. कॉफीचे शरीरासाठी काही फायदेही आहेत. मात्र, सध्या ब्लॅक कॉफीचा ट्रेंड वाढला आहे. विशेषतः यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होऊ नये, यासाठी अनेक जण ब्लॅक कॉफीवर अधिक विश्वास ठेवत आहेत. सोशल मीडियामुळेही ब्लॅक कॉफीचा ट्रेंड वाढला आहे. आता ब्लॅक कॉफी केवळ पेय राहिलेले नसून फिटनेस कल्चरचा एक भाग बनले आहे. मात्र, दूध घालून कॉफी पिणाऱ्यांना त्यामुळे काही नुकसान होते का, असा प्रश्न उपस्थित होतो.
कॉफीमध्ये दूध घालून प्यायल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात का? दिवसभर गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो का? ही कॉफी कोणत्या लोकांनी सावधगिरीने प्यावी?
दूध घातलेली कॉफी हानिकारक नाही. जर एखादी व्यक्ती दिवसातून एक किंवा दोन कप कॉफी घेत असेल आणि त्यात थोडे दूध व कमी साखर वापरत असेल, तर बहुतांश निरोगी व्यक्तींसाठी ती योग्य असू शकते.
दूधामुळे कॉफीमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचीही भर पडते. त्यामुळे केवळ कॉफीमध्ये दूध आहे म्हणून ती आरोग्यासाठी अपायकारक आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
कॉफीमध्ये जास्त प्रमाणात साखर, क्रीम किंवा सिरप मिसळले गेले किंवा दिवसभरात अनेक कप कॉफी प्यायली गेली तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रोजच्या आहारातील कॅलरी आणि साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
काही लोकांना दूध पचवण्यास त्रास होतो. अशा व्यक्तींना दूध घातलेली कॉफी प्यायल्यानंतर गॅस, पोट फुगणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
फिटनेस आणि वजनाबाबत वाढलेली जागरूकता हे ब्लॅक कॉफी लोकप्रिय होण्याचे एक प्रमुख कारण आहे. साखर आणि क्रीम नसलेल्या ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यातील कॅफिनमुळे काही काळ अधिक सतर्क आणि सक्रिय वाटू शकते. त्यामुळे जिम आणि फिटनेस कल्चरमध्येही ब्लॅक कॉफीला पसंती मिळत आहे.
मात्र, ब्लॅक कॉफी जितकी जास्त प्याल तितका जास्त फायदा होईल, असे नाही. जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास अॅसिडिटी, अस्वस्थता, झोपेचा त्रास किंवा हृदयाची धडधड वाढणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दूध घातलेली कॉफी किंवा ब्लॅक कॉफी यापैकी एकच पर्याय सर्वांसाठी चांगला आहे, असे म्हणता येणार नाही. कॉफीमध्ये काय मिसळले आहे, ती किती प्रमाणात घेतली जाते आणि तुमचे शरीर ती कितपत सहन करते, हे अधिक महत्त्वाचे आहे.



























































